न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२५) :- संत महात्म्यांच्या नावाने वेगवेगळ्या समाजांची आर्थिक विकास महामंडळे स्थापन करून हे सरकार जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केला.
पिंपरी येथे आयोजित महासंघ आणि मायक्रो ओबीसी, अलुतेदार, बलुतेदार, विमुक्त, भटके समाजाच्या जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी दळे म्हणाले की, माळी, धनगर, वंजारी समाजाने ओबीसींच्या आरक्षणाचा लाभ घेतला असला तरी मायक्रो ओबीसी, बलुतेदार, अलुतेदार, भटके, विमुक्त समाज वंचित राहिले आहेत. रोहिणी आयोगाची अंमलबजावणी आणि जातीवार जनगणना करून या समाजांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
प्रताप गुरव यांनी मायक्रो ओबीसी व भटके समाजावर ग्रामीण भागात होणाऱ्या अन्यायाची माहिती दिली. तर चंद्रकांत गवळी यांनी आर्थिक महामंडळांच्या निधीविषयी श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली.
बैठकीत अभिमन्यू दहितुले यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.