- अखंड हरिनाम गाथा पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव..
- श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान व कदम माऊली महाराजांच्या वतीने आयोजन..
- दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भंडारा डोंगरावर नियोजन बैठक संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
इंदोरी, तळेगाव दाभाडे, (दि. २३ ऑक्टोबर २०२५) :- श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान व वारकरी रत्न कदम माऊली महाराज संतभूमी उपासना व पारायण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला होणार यावर्षीचा माघ शुद्ध दशमी सोहळा…
जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह दिन माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने गेली ७० वर्षे पवित्र श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर होणारा अखंड हरिनाम गाथा पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव यावर्षी प्रथमच श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या सुमारे शंभर एकरच्या पटांगणात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान व वारकरी रत्न माऊली महाराज कदम संतभूमी उपासना व पारायण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात येणार आहे.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्णमोहोत्सवी जन्मोत्सव सोहळा, श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृतमोहोत्सवी संजीवनी समाधी सोहळा, श्री ज्ञानोबाराय व श्री तुकोबाराय पालखी सोहळ्याचे जनक श्री तपोनिधी नारायण महाराज देहूकर त्रिशतकोत्तर अमृतमोहोत्सवी प्राकट्यवर्षा निमित्त तसेच श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमोहोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळा या सर्वांचे औचित्य साधून जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मदिवस वसंतपंचमी ते त्रयोदशी दि. २३ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत अतिशय भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती या सोहळ्याचे प्रमुख वारकरी रत्न हभप छोटे माऊली महाराज कदम यांनी दिली.
या सोहळ्याचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बुधवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे वारकरी रत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या नियोजन बैठकीसाठी श्री विठ्ठल-रुख्माई देवस्थान ट्रस्ट, पंढरपूरचे विश्वस्त हभप शिवाजीमहाराज मोरे, देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी विश्वस्त माणिकमहाराज मोरे, हभप सुदाममहाराज भोसले, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, विद्यमान उपाध्यक्ष अनिल लोखंडे, संत साहित्याचे अभ्यासक हभप सचिनमहाराज पवार, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व सर्व विश्वस्त मंडळ, माजी सभापती विठ्ठल शिंदे, हभप रविंद्र महाराज ढोरे, माजी जि. प. सदस्य प्रशांत ढोरे, विजय बोत्रे, गजानन शेलार, रवींद्र भेगडे, माजी नगरसेवक आप्पा बागल, अरविंद शेवकर तसेच पुणे जिल्ह्यातील कीर्तनकार, वारकरी संप्रदायातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
येणाऱ्या दोन वर्षानंतर वयाची शताब्दी पूर्ण करणाऱ्या श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अर्धयु शांतीब्रह्म हपभ मारुतीबाबा कु-हेकर महाराज व आयुष्याचा अमृत महोत्सव साजरा करणारे श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे हभप भास्करगिरी महाराज यांचा अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने विशेष सन्मान करून गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती या बैठकीच्या निमित्ताने हभप छोटे माऊली महाराज कदम यांनी दिली.
पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ६.३० ते ११ कालावधीत दोन स्वतंत्र मंडपात स्वतंत्ररित्या गाथा पारायण व ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते दुपारी १२.३० या कालावधीत पुणे जिल्ह्यातील आदर्श कीर्तनकारांची कीर्तने, दुपारी १२.३० ते ३ पर्यंत महाप्रसाद, नंतर दुपारी ३ ते ४ या कालावधीत हरिपाठ, सायंकाळी ४ ते ५ कालावधीत संतचरित्र कथा, सायंकाळी ६.३० ते राञी ८.३० या कालावधीत महाराष्ट्रातील थोर कीर्तनकारांची कीर्तने व रात्री ८.३० नंतर महाप्रसाद असे नियोजन असून पुणे जिल्ह्यातील ५० गावातील वारकरी बंधू- भगिनी या महाप्रसादासाठी रोज एक लाख भाकरी देणार आहेत असे महाराजांनी सांगितले.
या वर्षभरात छोटे माऊली महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाने राज्यभरात एकूण सहा पारायण सोहळे मोठ्या स्वरूपात आयोजन करण्यात येणार असून या सर्व सप्ताहांमध्ये व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड अशी संकल्पना प्रत्येक सप्ताहामध्ये राबवून समाज जागृती देखील करण्यात यावी अशी सूचना हभप शिवाजीमहाराज मोरे यांनी केली. संत ज्ञानोबा-तुकोबा व सकल संतांच्या कार्याचा प्रसार व प्रचाराचे कार्य सातत्याने करत असणारे छोटे माऊली महाराज कदम यांच्या पाठीशी संत तुकाराम महाराज संस्थान व श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे सदैव पाठबळ राहील व महाराजांच्या या कार्यासाठी तन-मन-धन आम्ही सदैव अर्पण करू अशी ग्वाही या निमित्ताने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.
भंडारा डोंगराच्या पायथ्याला होणाऱ्या या भव्य सप्ताह सोहळ्यासाठी पर्यावरण रक्षण ही संकल्पना राबवण्यात येईल व एक लाखापेक्षाही जास्त वड, पिंपळ, चिंच, लिंब अशा देशी वृक्षांची लागवड श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या चहूबाजूने करण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब काशीद यांनी दिली. या नियोजन बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पुणे जिल्ह्यातील सर्व मान्यवर व भाविकांसाठी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठक नियोजन मीटिंगचे सूत्रसंचालन संतसेवक मनोहर ढमाले यांनी केले.
श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील भव्य-दिव्य मंदिर निर्माण कार्याला संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडीभाऊ भोंडवे यांनी पाच लाख रुपये व नवलाख उंबरे येथील भाविक बबूशा कडलक परिवाराकडून एक लाख रुपयाची देणगी या नियोजन बैठकीमध्ये देण्यात आली. तसेच भंडारा डोंगराच्या पायथ्याला होणाऱ्या सप्ताहकरिता इंदुरीचे माजी उपसरपंच दिलीप ढोरे यांस कडून एक लाख रुपयाची देणगी देण्यात आली.













