- शेकडो उद्योजकांनी घेतला लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण, (दि. १७ ऑक्टोबर २०२५ :- ‘एकच ध्यास — उद्योजकता विकास’ या उक्तीप्रमाणे चाकण MIDC उद्योजक संघटना अनेक उपक्रमांद्वारे उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. गेली पाच वर्षे ही संघटना दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी अव्याहतपणे विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि संस्थांना आमंत्रित करून सेमिनार आयोजित करत असते. या उपक्रमांचा थेट लाभ उद्योजकांना होत असून, त्यातून त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनात सातत्याने भर पडत आहे.
त्याच परंपरेत दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी चाकण MIDC उद्योजक संघटनेतर्फे हॉटेल स्प्री, पिंपरी येथे ‘Financial Investment Basics & Growth’ या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारचे मार्गदर्शन २० वर्षांचा अनुभव असलेले आणि १००० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा पोर्टफोलिओ व्यवस्थापित करणारे नामांकित क्रिसेंट म्युच्युअल डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचे सर्वेसर्वा भूषण वाणी यांनी केले.
या सेमिनारमध्ये वाणी सरांनी उद्योजकांच्या मनातील गुंतवणुकीबाबत असलेल्या अनेक गैरसमजांना दूर केले. काही लोक सोने किंवा रिअल इस्टेटलाच सर्वोत्तम गुंतवणूक मानतात, परंतु महागाईचा विचार आणि परताव्याचे प्रमाण पाहता म्युच्युअल फंडसारख्या पर्यायांचा दीर्घकालीन फायदा अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच वय आणि गुंतवणुकीतील योग्य रेशो कसा असावा, देशाच्या आर्थिक उन्नतीत गुंतवणुकीची भूमिका काय असते याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सेमिनारदरम्यान अनेक उद्योजकांनी स्वतःचे प्रश्न उपस्थित केले, ज्यांची समाधानकारक उत्तरे वाणी सरांनी दिली. या उपक्रमासाठी नेहमीप्रमाणे शेकडो उद्योजक उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सांगता चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी केली.













