न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :- दिवाळीच्या आनंददायी पार्श्वभूमीवर उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे “किल्ले बनवा” या पारंपरिक आणि संस्कारवर्धक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यंदाच्या स्पर्धेमध्ये एकूण २१० विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कल्पकतेतून आणि देशभक्तीच्या भावनेतून विविध गड-किल्ल्यांची उत्कृष्ट मॉडेल्स साकारली. सर्व सहभागी मुलांना सन्मानचिन्ह, आणि आकर्षक भेटवस्तू प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच “निबंध लेखन स्पर्धा” आणि “चित्रकला स्पर्धा”तील विजेत्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “आमचा हा उपक्रम केवळ स्पर्धा म्हणून नव्हे तर आपल्या लहानग्यांना छत्रपती शिवरायांचा वारसा आणि इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आहे. प्रत्येक वर्षी आम्ही ‘किल्ले बनवा स्पर्धा’ घेतो, पण यंदा आम्ही या मुलांना प्रत्यक्ष गड-किल्ल्यांवर नेऊन त्या ठिकाणांचा भौगोलिक आणि ऐतिहासिक परिचय देण्याची योजना आखली आहे. इतिहास अभ्यासक यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना खरी प्रेरणा मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. तुम्ही किल्ला बनवला — पण त्यामागील संकल्पना आणि शौर्याची कहाणीही जाणून घेणं महत्त्वाचं आहे — हे आम्ही यंदा कृतीतून दाखवणार आहोत.”
या उपक्रमामुळे लहान मुलांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, देशभक्ती आणि संस्कृतीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी , उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री.संजय भिसे, समीर देवरे बाळासाहेब काटे प्रकाश झिंजुर्डे राजेंद्र जसवाल,बाळासाहेब चौधरी अमोल नारखेडे यांच्यासह विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लब चे सभासद ,ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे सर्व सभासद , लिनिअर गार्डन जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील स्पर्धक , नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













