- प्रतिभा महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :- शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद पुणे आणि कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी रुची निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि सृजनशीलतेला वाव देणे या उद्देशाने घेण्यात आली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण चौदा शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विज्ञानावर आधारित नाट्यसादरीकरणांद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकत विज्ञानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. नाट्यलेखन, अभिनय, संवाद कौशल्य, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या निकषांवर परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली.
पहिले पारितोषिक न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी (नाटिका – किंजा इन्फनाइट) यांना मिळाले. दुसरे पारितोषिक हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूल, पिंपरी (नाटिका – पेटंट फ्री) यांना मिळाले, तर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, भोर (नाटिका – डिजिटल भारत जीवन सक्षमीकरण) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे परीक्षण बानी रॉय चौधरी, निर्मला गणेश नाईक आणि निशा अशोक निकम यांनी केले.
उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. अशोक नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलता, सर्जनशीलता आणि विज्ञानाविषयी आवड वृद्धिंगत झाल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद पुणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “या विज्ञान स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही विज्ञान शिकवणे सोपे होईल,” असे मत व्यक्त केले.
या वेळी जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे विशेष उपस्थित होते.
समारोप प्रसंगी संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, पर्यवेक्षक विराज खराटे आणि प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या हस्ते विजेत्या संघांना प्रमाणपत्रे आणि आकर्षक पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि आयोजक मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, डायरेक्टर डॉ. तेजल शहा, प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी केले, तर डॉ. सुनीता पटनाईक यांनी आभार प्रदर्शन केले.













