- श्रावण हर्डीकर यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी; नवे आयुक्त कोण?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावर सध्या असलेली प्रशासकीय अनिश्चितता वाढत चालली आहे. राज्य शासनाने माजी आयुक्त शेखर सिंह यांची बदली करून त्यांच्याकडे नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी दिल्यानंतर, महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. मात्र, शहराला पुर्णवेळ आयुक्त कधी मिळणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्ती देण्यात आल्याने प्रशासकीय फेरबदलाची प्रक्रिया पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे महापालिकेत नवे आयुक्त नेमणुकीचा निर्णय काही काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नव्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत पालिका व राजकीय वर्तुळात अनेक नावे चर्चेत आहेत. दररोज नवीन नावांच्या चर्चेमुळे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विषयावर विचारणा झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “सध्या कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. दोन-तीन जणांची नावे चर्चेत आहेत. सध्यासाठी श्रावण हर्डीकर यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.”
महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून लोकप्रतिनिधींचा अभाव असल्याने प्रशासनावर पूर्णपणे अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच प्रमुख पद रिक्त राहिल्यास महत्त्वाच्या विकासकामांच्या गतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील मेट्रो प्रकल्प, पाणीपुरवठा सुधारणा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियोजन आणि इतर पायाभूत योजनांना स्थिर आणि निर्णयक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे प्रशासनातील अनेक अधिकारी मान्य करतात. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा आहेत की राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन शहराला पुर्णवेळ आयुक्त नेमावा.












