न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर आणि रहाटणी या भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या १००० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून बिर्ला हॉस्पिटलजवळ काल (दि. २६ ऑक्टोबर) पाणीगळती सुरू झाली होती. ही गळती रोखण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर हाती घेऊन अवघ्या पाच तासांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
वाकड, थेरगाव, पिंपळे निलख आणि पिंपळे सौदागर येथील पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी सदर जलवाहिनी ही २४ तास कार्यरत असते. मात्र जलवाहिनी गळती दुरुस्तीच्या कामासाठी अचानक ‘शट डाऊन’ घ्यावा लागल्याने सदर भागात कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत होता. आज सायंकाळपासून सदर भागातील पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.
बिर्ला हॉस्पिटल परिसरात जलवाहिनीतून पाणीगळती सुरू झाल्याचे लक्षात येताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ तेथे दुरुस्तीचे काम हाती घेतले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम अल्पावधीतच पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका…













