न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :- लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार करणारा आलोक अजयकुमार पुरोहित (वय ४३, रा. जयपूर) यास पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, ६९, ११७(२), ३७१ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
पुरोहितने विविध Matrimonial Apps वर स्वतःला अविवाहित दाखवून एका घटस्फोटीत महिलेशी ओळख वाढवली आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केले. तपासात तो विवाहित असून इतर महिलांचीही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
हा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपआयुक्त विशाल गायकवाड यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.












