- अडीच लाखांचा दंड वसुल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २९ ऑक्टोबर २०२५) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाने विविध वाहनांवर मोठी कारवाई करत सुमारे दोन लाख ४७ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. १५ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ही विशेष मोहिम राबविण्यात आली.
आरटीओच्या वायुवेग आणि भरारी पथकांनी शहरातील प्रमुख महामार्ग, बसस्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली. या कारवाईत ४५९ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २२९ वाहने विविध नियमभंगात दोषी आढळली. तसेच जादा भाडे आकारणाऱ्या २२ बसवर कारवाई करण्यात आली आहे.
वाहनांची मान्यता व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, जादा भाडे आकारणे, वाहनरचनेत बदल, आवश्यक कागदपत्रांचा अभाव, परवाना नसताना वाहन चालविणे अशा विविध गुन्ह्यांवर कारवाई करण्यात आली.
दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व प्रवास सुरक्षित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.













