न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २९ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली व शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला.
या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून सहभाग घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत प्रभाग क्र. ३ चऱ्होली अंतर्गत सैनिक कॉलनी, सेव्हन हिल्स कॉलनी परिसरात विद्युत विषयक कामे करणे, पुणे–आळंदी रस्त्यापासून चऱ्होली–लोहगाव हद्दीपर्यंत विकास आराखड्यातील ९० मीटर रस्त्यावरील उर्वरित विद्युत विषयक कामे करणे, फ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. १, ११, १२ व १३ मधील औष्णिक धुरीकरणासाठी तीन चाकी चार रिक्षा टेम्पो वाहन इंधनासह प्रतिदिन भाड्याने घेणे, कमी खर्चास मान्यता देणे, महापालिकेच्या नर्सरीत शोभिवंत रोपे तयार करून देखभाल करणे, ई क्षेत्रीय कार्यालयाकडील अंदाजपत्रकातील सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकातील चालू विकासकामांच्या तरतुदींमध्ये वाढ व घट करणे, क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. २, ८ व ९ मधील पाणीपुरवठा ट्रेचेसचे मजबुतीकरण करून डांबरीकरण करणे तसेच पेव्हिंग ब्लॉकची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे, प्रभाग क्र. २१ मधील अभिमन्यू चौक ते म्हाडा प्रकल्पापर्यंत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे कामी मूळ सल्लागाराकडून नव्याने करारनामा करणे, महानगरपालिकेच्या आर.ई.एफ. फॉर लोकल एरिया प्लॅन करिता सल्लागार नेमणे, पुणे ग्रँड चॅलेंज टूर (PGCT) अंतर्गत विनोदे वस्ती चौक–डी.वाय. पाटील कॉलेज आकुर्डी येथे पायाभूत सुविधा करणे, अ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील शौचालय देखभाल, दुरुस्ती व साफसफाई कामाकरिता नवी दिशा या योजनेंतर्गत महिला बचत गटांना देण्यात आलेल्या स्वच्छता कामासाठी लहान जेटिंग मशीन खरेदी करणे, वैशालीताई काळभोर महिला बचत गट यांच्या सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या देखभाल व दुरुस्ती कामकाजास मुदतवाढ देणे, प्रभाग क्र. ९ मधील आरक्षण क्र. ६६ (पीएमपीएमएल म.रा.वि.वि.कं.लि.) यांस सुरक्षा ठेव व इतर बाबींसाठी रक्कम अदा करणे, मे. रामचंद्र इंटरप्रायझेस यांचे औष्णिक धुरीकरणासाठी तीन चाकी चारचाकी वाहन इंधनासह प्रतिदिन भाड्याने घेणे, ह प्रभागांतर्गत सन २०२३-२४ करिता पिंपरी चिंचवड हद्दीबाहेर आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा (शेवाळेवाडी) कामाच्या सुधारित वाढीव खर्चास मान्यता देणे, महापालिकेच्या विविध विभागांच्या संगणक प्रणालींच्या देखभाल व दुरुस्ती कामाकरिता मुदतवाढ देणे, यासह विविध विषयांना मान्यता देण्यात आली.
याशिवाय स्थायी समिती अधिकारांतर्गत मा. प्रशासक यांच्याकडील महापालिकेच्या रहाटणी सर्वे नं. ९६, लांडेवाडी, दिघी, चऱ्होली, बोपखेल, कृष्णानगर से.२२, पाटीलनगर, जाधववाडी से.१०, गवळी माथा, सांगवी गावठाण, सांगवी पीडब्ल्यूडी, सांगवी स.नं. ८४, पिंपळे गुरव, दापोडी, थेरगाव गावठाण, थेरगाव स.नं. ९, थेरगाव लक्ष्मणनगर, काळाखडक वाकड, काळाखडक बुस्टर व पुनावळे येथील पंपहाऊसचे चालन करण्याच्या सुधारित खर्चास मान्यता देणे, प्रभाग क्र. २५ मधील वाकड येथील आरक्षण क्र. ४/२३ मध्ये शाळेचे ग्राउंड डेव्हलपमेंट, फर्निचर व आवश्यकतेनुसार स्थापत्यविषयक कामे करण्याच्या तरतुदींमध्ये वाढ/घट करण्यास मान्यता देणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली.













