न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड, (दि. २९ ऑक्टोबर २०२५) :- चिंचवडगावात घडलेल्या नकुल आनंदा भोईर (वय ४०) खुन प्रकरणाला नवे धक्कादायक वळण आले आहे. या प्रकरणातील अटक महिला आरोपी हिचा प्रियकर सिद्धार्थ दिपक पवार याचा खुनात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
२४ ऑक्टोबर रोजी नकुल भोईरचा त्याची पत्नी चैताली हिने निळ्या रंगाच्या कपड्याने गळा आवळून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ पवारचा या प्रकरणात सहभाग स्पष्ट झाले.
तपासात उघड झाले की, चैताली आणि सिद्धार्थ यांचे प्रेमसंबंध होते. नकुल भोईर हा त्यांच्या नात्याला आड येत असल्याने तसेच कर्जाच्या वादातून दि. २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या भांडणानंतर, दोघांनी संगणमताने नकुलचा गळा ओढणीने आवळून खून केला.
सिद्धार्थ पवारला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल करंबळकर करत आहेत.













