- महापालिकेने मुंबई चौपाटीच्या धर्तीवर येथील पवना नदी घाटाचा विस्तार करावा..
- उत्तर भारतीय बांधवांच्या वतीने विजय गुप्तांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव, (दि. २९ ऑक्टोबर २०२५) :- दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंचवडगावातील पवना नदी किनारी मोठ्या उत्साहात हनुमान मित्र मंडळ आणि छठ पूजा समिती आयोजित उत्तर भारतीयांचा पारंपरिक छठ पूजेचा भव्यदिव्य सोहळा सोमवारी ( दि. 27) रोजी उत्साहात पार पडला
घाटावर सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, भव्य गंगा आरती सह विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कुटूंबाला सुख, समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य लाभावे यासाठी उत्तर भारतीय महिला सूर्याची उपासना म्हणून छटपुजेचे व्रत करतात. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याची प्राचिन काळापासूनची श्रध्दा असल्याचा अनुभव येथील भाविकांनी सांगितला. यावेळी भाविकांच्या ” जय छठमाता ” च्या गजराने वातावरण प्रसन्न झाले होते.
यावेळी छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता, विनोद वाकडकर, खंडुशेठ चिंचवडे, मारुती भापकर, विशाल यादव, चिंचवडे आणि काळभोर ग्रामस्थ आदींसह हजारो उत्तर भारतीय भक्त भाविक उपस्थित होते.
छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता म्हणाले, हिंदू शास्रानुसार छठपूजेला सूर्यछठ अथवा छठपर्व म्हणतात. गेल्या २० ते २५ वर्षांपासून आम्ही या ठिकाणी छटपूजेचा उत्सव साजरा करत आहोत. महापालिका, पोलीस प्रशासन आणि स्थानिकांचे देखील सहकार्य या कार्यक्रमास नेहमीच असतं. उत्तर भारतीय नागरिकांची शहरात संख्या वाढली आहे. छठ पूजा कार्यक्रमास चिंचवडगावातील पवना नदी घाट अपुरा पडत आहे. त्यामुळे या घाटाचा विस्तार होणे गरजेचे आहे. महापालिकेने मुंबई चौपाटीच्या धर्तीवर येथील पवना नदी घाटाचा विस्तार करावा.
या उत्सवात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय कुटुंबांनी बडकी छठ (संध्या अर्ध) दिले. तसेच अखेरच्या दिवशी मंगळवारी सकाळी पवनामाईच्या पाण्यात उभे राहून सूर्यदेव बाहेर येण्याची पूर्ण भक्तिभावाने वाट पहत सूर्योदय झाल्यावर छठ मैयाचा जप करून सूर्याला अर्घ्य दिले.
दरम्यान भाविकांनी सोमवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदरच छटमाईची पूजा मांडत तिथे विधिवत पूजा केली होती. या मांडणीमध्ये चारही बाजूने ऊस पुळणीत रोवून उसाचा मांडव करून त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेऊन त्यावर दिवा पेटवला. त्यावर विटाची मांडणी करून पूजेची मांडणी केली होती. त्यासमोर खवा, गव्हाचं पीठ आणि तुपापासून बनवलेला प्रसाद आणि फळं यांचा नैवेद्य दाखविण्यात आला होता. सूर्याचा अस्त होताना महिलांनी गाईच्या दुधाचे अर्घ्य दिले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छठ पूजा समिती अध्यक्ष जितेंद्र क. गुप्ता, कार्याध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव, उपाध्यक्ष देवानंद आर. गुप्ता, सचिव अशोक डी. गुप्ता, सदस्य जितेंद्र जे. गुप्ता, महेश गुप्ता, प्रेम शंकर राय फिल्म प्रोड्युसर, विकास मिश्रा अध्यक्ष, पूर्वाचल विकासमंच, मुन्ना डी. गुप्ता, अनिल एस. गुप्ता, उमा के. गुप्ता, सचितानंद मिश्रा, टी. एन. तिवारी, सुभाष एम. गुप्ता, श्यामसुंदर गुप्ता, मदन आर. गुप्ता, पप्पु डी. गुप्ता, सुजित एम. गुप्ता, शंकर गुप्ता, शंभू गुप्ता, रमेश गुप्ता, भोला बी. गुप्ता, मनोज आर. गुप्ता, राजेश जे. गुप्ता, विनोद गुप्ता, संतोष गुप्ता आदींनी परिश्रम घेतले.
अरविंद म्युजिकल ग्रुपचे गायक सुनिल यादव यांनी धार्मिक गीते सादर केली.













