न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात बुधवारी स्थायी समितीची बैठक संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली व शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला.
दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना व विकास विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या पिंपळे सौदागर परिसरातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या रस्ता क्रमांक ७८ ते १२२ पर्यंतच्या १८ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनास आयुक्तांनी तातडीने मंजुरी दिली आहे.
या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून सहभाग घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम २०५ अंतर्गत घोषित या विकास योजनेबाह्य रस्त्याचा बहुतांश भाग आधीच विकसित झाला असून, उर्वरित रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाचे काम आता गतीमान होणार आहे.
दि. १५ मे २०२५ रोजी उपमुख्यमंत्री यांनी या परिसराला भेट देत रस्ता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या भागात लोकसंख्या आणि वाहतूक वाढल्याने रस्ता पूर्ण होणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्राचे भूमिसंपादन पुनर्वसन व नुकसानभरपाई प्रक्रिया भूसंपादन अधिनियम २०१३ नुसार राबविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडे पाठविण्यात आला.
सदर प्रस्तावास महानगरपालिकेचे आयुक्त (प्रशासक) श्रावण हर्डीकर यांनी आज मान्यता दिली. या निर्णयामुळे पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहेत.













