न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२५) :- राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चमर्यादेत मोठी वाढ जाहीर केली आहे. बुधवारी जारी आदेशानुसार, आधीपेक्षा दीडपट वाढ करत नव्या वर्गवारीनुसार मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ‘ब’ वर्गात समाविष्ट असून, या वर्गातील उमेदवारांसाठी खर्चमर्यादा आता १३ लाख रुपये इतकी ठरविण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा सुमारे ७ ते ८ लाखांच्या दरम्यान होती.
नव्या नियमांनुसार मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी १५ लाख रुपये, ‘क’ वर्गातील (कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, वसई-विरार) महापालिकांसाठी ११ लाख, तर उर्वरित १९ महापालिकांसाठी ९ लाख रुपयांची मर्यादा निश्चित झाली आहे.
२०१७ मध्ये ही मर्यादा सदस्यसंख्येच्या आधारे ठरविण्यात आली होती. मात्र, आता महापालिकांची वर्गवारीनुसार विभागणी करून मर्यादा निश्चित केल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी कळविले आहे.













