न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डुडुळगाव येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पाचा खर्च आणखी वाढला आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पावर आता १७ कोटी १५ लाख ५६ हजार ७६८ रुपये अतिरिक्त खर्च होणार आहे.
या अंतर्गत प्रकल्प परिसरात मूलभूत सुविधा उभारण्यासाठी १३ कोटी ९७ लाख रुपये, तर शेजारील नाल्याच्या विकासासाठी ३ कोटी १७ लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही कामे शांती कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या ठेकेदाराकडून करण्यात येणार असून, त्यांची निविदा अनुक्रमे ४.१० आणि ४.२७ टक्के अधिक दराने स्वीकृत करण्यात आली आहे.
या १६८ कोटी रुपयांच्या प्रकल्पात १,१९० सदनिकांसाठी १५ मजली पाच इमारतींचे बांधकाम सुरू आहे. नवीन कामांच्या मंजुरीमुळे प्रकल्पाचा एकूण खर्च लक्षणीयरीत्या वाढला असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.













