- ग्रामस्थांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ३० ऑक्टोबर २०२५) :- श्रीक्षेत्र देहूगाव ते येलवाडी फाटा या महत्त्वाच्या जोडरस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, तो सध्या अपघातांचा सापळा ठरत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. ‘रस्त्यात खड्डे आहेत’ एवजी ‘खड्यात रस्ता आहे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम झाले होते. मात्र, पावसामुळे आणि रोजच्या वाहनांच्या वर्दळीमुळे मुरूम उखडून रस्त्यावर पसरला आहे. परिणामी, दररोज अपघातांची मालिका सुरू असून, एका दिवसात तब्बल नऊ अपघात झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलाचालकांनाही याचा मोठा फटका बसत आहे.
ग्रामस्थांनी नगररचना विभागाच्या दुर्लक्षावर टीका करत, रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. “दोन दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि संबंधित विभागाला टाळे ठोकले जाईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.













