- २० नोव्हेंबरपर्यंत कर भरणाऱ्यांना ५० गृहउपयोगी वस्तूंची बक्षिसे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू : (दि. ३० ऑक्टोबर २०२५) :- देहू नगरपंचायतीने नागरिकांना वेळेत कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी यंदाही आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. २० नोव्हेंबरपर्यंत मालमत्ता व पाणीपट्टीचा कर भरणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉद्वारे ५० आकर्षक गृहउपयोगी वस्तूंची बक्षिसे देण्यात येणार आहेत. मुदतीनंतर कर भरल्यास दरमहा २ टक्के शास्ती आकारली जाईल, अशी माहिती कर विभाग प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.
नगरपंचायतीकडे सध्या एकूण १९ कोटी ६० लाख रुपये थकबाकी असून, आतापर्यंत ४ कोटी १२ लाख रुपये वसूल झाले आहेत. मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही कर वेळेत भरल्यास नागरिकांना १ टक्के सवलत आणि थकबाकीदारांसाठी व्याज सवलतीची अभय योजना देण्यात आली होती.
कर वसुली वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपूर्वी कर भरणाऱ्यांना कूपन दिले जाईल व त्यातून लकी ड्रॉद्वारे विजेते निवडले जातील. नागरिकांनी घरबसल्या ऑनलाइन कर भरण्याची सुविधा वापरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.













