- वित्त विभागाकडे सेवा वर्ग, मोनिका ठाकूर यांच्या नियुक्तीकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (क्रमांक एक) प्रदीप जांभळे पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांची सेवा मूळ प्रशासकीय विभाग म्हणजेच वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी याबाबतचा आदेश शुक्रवारी (दि. ३१ ऑक्टोबर) जारी केला.
जांभळे पाटील यांनी २२ सप्टेंबर २०२२ रोजी प्रतिनियुक्तीने महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांची मुदत १८ सप्टेंबर २०२५ रोजी संपली होती. त्यामुळे त्यांच्या बदलीची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर शुक्रवारी त्यासंदर्भातील आदेश निघाले असून त्यांची प्रतिनियुक्ती अधिकृतपणे संपुष्टात आली आहे.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्तपदाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी महसूल विभागाने मोनिका ठाकूर यांची बदली केली असली तरी त्यांना नगरविकास विभागाकडून नियुक्ती आदेश मिळणे बाकी आहे. त्यामुळे ठाकूर यांना पदभार कधी मिळतो आणि महापालिकेतील प्रशासनात पुढील बदल कसे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













