न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२५) :- कुलाबा क्राइम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगत अज्ञात व्यक्तीने चिखलीतील ५९ वर्षीय नागरिकाची तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोनि फडतरे करत आहेत.
ज्ञानेश्वर पांडूरंग नाझरे (रा. कृष्णानगर, आकुर्डी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने २३ मार्च २०२५ रोजी फोन करून “तुमच्या आधार क्रमांकावरून मुंबईतील कॅनेरा बँकेत मनी लॉन्डरिंगसाठी खाते उघडले आहे” असे सांगून त्यांना अटक होऊ शकते, अशी भीती दाखवली.
फसवणूक करणाऱ्याने नाझरे यांना एका हॉटेलमध्ये राहण्यास सांगून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल सतत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांना फसवणूक करून आयसीआयसीआय बँक खाते क्रमांकावर आरटीजीएसद्वारे १० लाख रुपये पाठवायला लावले. या प्रकारामुळे शहरात पुन्हा एकदा सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका अधोरेखित झाला आहे.













