- महापालिकेकडून सल्लागार संस्थेची नेमणूक; नऊ महिन्यांत आराखडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरी मेट्रो सेवा सुरू झाली असून, पिंपरीपासून निगडीपर्यंतचे काम सुरू आहे. भविष्यात निगडी ते चाकण असा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. मेट्रो स्थानकांच्या ५०० मीटर परिघात ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट (टीओडी) झोन घोषित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र नियोजन आराखडा तयार केला जाणार आहे.
या आराखड्याच्या तयारीसाठी एससीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट या सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात आली असून, स्थायी समितीने यास मंजुरी दिली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या निर्णयाला संमती दिली आहे. सल्लागार संस्थेमार्फत पुढील नऊ महिन्यांत आराखडा तयार केला जाणार आहे.
या आराखड्याद्वारे मेट्रो स्थानकांच्या आसपास वाहतूक, दळणवळण, पायाभूत सुविधा, नवीन बांधकामांचे नियोजन आणि गर्दी नियंत्रणाचा आराखडा तयार केला जाणार आहे. शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले की, सध्या विकास आराखड्यात टीओडी झोनचा समावेश नसल्याने ही स्वतंत्र प्रक्रिया राबवावी लागत आहे. शहरातील सर्व मेट्रो स्थानकांसाठी टीओडी झोन निश्चित केला जाणार असून, आराखड्याला शासनाची मान्यता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.













