- शेअर मार्केटमध्ये झटपट नफ्याचे आमिष पडले भारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२५) :- ‘मेमरी गुरु’ म्हणून ओळख सांगणाऱ्या इसमाने शेअर मार्केटमधील झटपट नफ्याचे आमिष दाखवत पिंपरीतील नागरिकाची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप फरार आहे.
खिलेश जीवाराम अडभैया (वय ४२, रा. आकुर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी ज्ञान प्रकाश साहू (रा. भिलाई, छत्तीसगड) याने स्वतःला “मेमरी गुरु” म्हणून ओळख करून दिली. प्रसिद्ध व्यक्तींसोबतचे छायाचित्र दाखवून त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध शेअर मार्केट योजना व गुंतवणूक पद्धती दाखवत झटपट नफ्याचे आमिष दाखवले.
फिर्यादी यांनी एकूण ५० लाख रुपये गुंतवले. सुरुवातीला काही परतावा मिळाल्यानंतर आरोपीने संपर्क तोडला व रक्कम परत केली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोउपनि केणे करत आहेत.













