- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा निश्चित होण्याची शक्यता?..
 - निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर चर्चा?…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०४ नोव्हेंबर २०२५) :- राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. ज्यात या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आता लवकरच या निवडणुका होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या, असे निर्देश सरकारला दिले आहे. या निर्देशानंतर सरकारमधील सर्वच पक्ष हे तयारीला लागले आहेत. त्यातच आता राज्य निवडणूक आयोगाची निवडणुकांची तयारी पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांत या निवडणुका घेईल, अशी योजना आखत आहे. यात सुरुवातीला नगर परिषदा आणि नगर पंचायती, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्व पक्ष आपापल्या स्तरावर तयारीला लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्षांनी मतदार यादीतील त्रुटींवरून, दुबार मतदार यावरुन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र आयोगाने ही फेटाळल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच निवडणूक आयोग हे कोर्टाने दिलेल्या वेळेत निवडणुका घेण्यावर ठाम असल्याचे बोलल जात आहे.
दरम्यान आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून नेमकी कोणती घोषणा होते, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतात का, संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल, आचारसंहिता कधी लागू होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आज दुपारी ४ वाजता निवडणूक आयोग निवडणुकांचे बिगुल वाजवणार का, हे स्पष्ट होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. सध्या २९४ नगरपालिकांच्या निवडणुका आधी घेऊन, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यावर विचार सुरू आहे. ओल्या दुष्काळामुळे पुरग्रस्त भागांमध्ये मदत न पोहोचल्याने याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता असून, मदतकार्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये चिंता असल्याचे वृत्त आहे.
                                                                    
                        		                    
							












