- आज जाहीर होणारी प्रारूप मतदार यादी पुढे ढकलली..
- आता या तारखेला होणार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी गुरुवारी (दि. ६) प्रसिद्ध होणार होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम अचानक बदलत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख १४ नोव्हेंबर अशी पुढे ढकलली आहे.
महाविकास आघाडीकडून मतदार यादीत सुधारणा करून दुबार व मृत मतदारांची नावे वगळावीत, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आंदोलनेही सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवरच राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचे समजते.
नवीन वेळापत्रकानुसार, प्रारूप मतदार यादीवर सूचना व हरकती २२ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त हरकतींची सुनावणी करून अंतिम मतदार यादी ६ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी ८ डिसेंबरला, तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.












