- पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकऱ्यांची मुंबईत हजेरी..
- युतीचा धर्म पाळणार की स्वतंत्र लढणार? आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई | गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आज सायंकाळी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मते जाणून घेण्यात येणार आहेत. विशेषतः ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवायची की स्वतंत्ररित्या सामोरे जायचे, याबाबत निर्णायक चर्चा होणार आहे. शहरातील राजकीय परिस्थिती, संभाव्य उमेदवारांची निवड आणि संघटनात्मक बळकटीकरणावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शहरातील वाढत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, जागा वाटपाबाबतही प्राथमिक निर्णय या बैठकीत घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीतर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्या प्रभागांमध्ये आपले वर्चस्व राखायचे आणि कोणत्या ठिकाणी महायुतीची सांगड घालायची याबाबतचा अंतिम आराखडा देखील चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे कार्यकर्ते आणि विरोधक दोघांचेही लक्ष लागले आहे.
पक्षश्रेष्ठींकडून आज सायंकाळी पाच वाजता शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. बैठक संपल्यानंतर विषय सांगितला जाईल. – योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी-चिंचवड शहर…













