- पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आदेश..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०२५) :- वकिलाच्या अशिलाला मदत करण्यासाठी तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात नाव आलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप सावंत यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत.
हे प्रकरण निलंबित पोलिस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ४४, रा. दिघी रोड, भोसरी) याच्याशी संबंधित आहे. चिंतामणी हा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडील चार कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी होता. तपासादरम्यान अशिलाला मदत करण्यासाठी तसेच जामीन अर्जावर पोलिस उत्तर दाखल करण्यासाठी त्याने दोन लाख रुपयांची लाच मागितली, मात्र नंतर हा व्यवहार दोन कोटी रुपयांपर्यंत गेला.
या पैकी एक कोटी वरिष्ठ पोलिस निरीक्षकासाठी आणि एक कोटी स्वतःसाठी मागितल्याचे तपासात उघड झाले. तक्रारदारांच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चिंतामणीला ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना पुण्यात समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रंगेहाथ पकडले.
त्याच्या दिघी येथील घरावर छापा टाकण्यात आला असता ५१ लाख रुपयांची रोकड, तसेच दागदागिने व कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर आयुक्त चौबे यांनी कडक पावले उचलत उपनिरीक्षक चिंतामणीला निलंबित केले, तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप सावंत यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले.
आता सावंत यांच्या खातेनिहाय चौकशीला सुरुवात झाली असून, चौकशीत जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई होणार असल्याची माहिती आयुक्तालयातून देण्यात आली आहे.













