- तत्कालीन आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या लागोपाठच्या बदल्यांमुळे प्रशासन गोंधळात!..
- बदली झालेला अधिकारी काही काळ थांबविण्याची महापालिकेवर नामुश्की…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ७ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार सध्या अक्षरशः “पांगळा” झाल्याची चर्चा शहरात जोर धरतेय. सत्ताधारी महायुतीच्या दबावाखालील सततच्या बदल्यांमुळे महापालिकेचे प्रशासकीय चाक डळमळीत झाले असून निर्णयप्रक्रिया ठप्प झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची घाईघाईत बदली करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनाही हलवण्यात आले. मात्र, पूर्णवेळ आयुक्त न देता तात्पुरता आयुक्तपदाचा पदभार देऊन मेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना महापालिकेत धाडले. आता तेही बिहार निवडणुकीत निरीक्षक म्हणून व्यस्त आहेत. परिणामी, महापालिकेतील अनेक विभाग निर्णयविना ‘ऑटो मोड’वर चालू आहेत.
दरम्यान, रिक्त झालेल्य अतिरिक्त आयुक्त 1 पदी अद्याप कोणाचीच वर्णी न लागल्याने बदली झालेले अतिरिक्त आयुक्त 1 जांभळे-पाटील यांना ११ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी प्रशासनाने नगरविकास विभागाकडे केली आहे. कारण, महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत होणार असून, निवडणूक विषयक महत्त्वाचे कामकाज त्यांच्या अखत्यारीत आहे.
तथापि, या सगळ्या हालचालींमागे राजकीय ‘टच’ आणि सत्ता खेळी असल्याची चर्चा अधिकाऱ्यांच्या दालनात जोरात सुरू आहे. वन व महसूल विभागाने मोनिका ठाकूर यांची अतिरिक्त आयुक्तपदी बदली केली होती, परंतु नगरविकास विभागाने त्या आदेशाला स्थगिती दिली.
अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्या, राजकीय हस्तक्षेप आणि नेतृत्वातील मतभेदांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका ही सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांवर अवलंबून, पण निष्क्रिय प्रशासनावर चालणारी ‘पांगळी’ संस्था बनली आहे. महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवतोय? प्रशासन की सत्ताधारी राजकारणी?अशी चर्चा अधिकारी वर्गात सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती शहराच्या विकासासाठी कितपत धोकादायक ठरेल, हा प्रश्न आता नागरिक आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.













