- अशा मतदारांकडून लेखी घेऊनच दिली जाणार मतदानाची परवानगी…
- महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०२५) :- दोन किंवा अधिक ठिकाणी नाव असलेल्या मतदारांना केवळ एकाच ठिकाणी मतदान करता येईल. अशा मतदारांच्या नावापुढे मतदारयादीत दोन ‘स्टार’ चिन्हांकित करण्यात येणार असून, संबंधित मतदाराकडून आधीच तो कोणत्या ठिकाणी मतदान करणार आहे, याची लेखी माहिती घेण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
राज्यात मतदार यादीतील घोळ आणि दुबार नोंदींवरून विरोधकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली होती. भोसरी विधानसभा मतदारसंघात तब्बल १२ हजारांहून अधिक मतदारांची नावे दुबार असल्याचा आरोप मनसेचे अजित गव्हाणे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर उपायुक्त पवार यांनी स्पष्ट केले की, जरी मतदाराचे नाव दोन ठिकाणी असले तरी त्याला एकदाच मतदान करता येईल. जर मतदाराने पूर्वलिखित पर्याय दिला नसेल, तर मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतल्यानंतरच मतदानास परवानगी दिली जाईल.
निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली आहे. तिच्यात नावांची भर अथवा वजाबाकी होणार नाही. दुबार नावे शोधण्याचे काम सुरू असून १४ नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २२ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जातील. सुनावणी घेतल्यानंतर ६ डिसेंबरला अंतिम आणि १२ डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध केली जाईल.
“मतदार यादीतील दुबार नावे शोधली जात आहेत. अशा मतदारांना एकाच ठिकाणी मतदानाची परवानगी असेल. त्यासाठी नावापुढे स्टार चिन्ह व लेखी पुष्टी आवश्यक असेल.”
— सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका…













