- महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयाकडून औपचारिक मान्यता प्रदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला अखेर स्वतःचा अधिकृत “घटक झेंडा” मिळाला आहे. महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयाकडून या झेंड्याला मान्यता देण्यात आली असून, हा झेंडा आता पोलिसांच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये वापरला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ रोजी झाली होती. मात्र, तेव्हापासून आयुक्तालयाकडे स्वतंत्र घटक झेंडा नव्हता. या झेंड्याबाबत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पुढाकार घेत विशेष रेखाचित्र तयार करून त्यास मंजुरी मिळवण्यासाठी पोलिस महासंचालकांना प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावास १० नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयाकडून औपचारिक मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाला अधिकृत घटक झेंड्याचे मानांकन प्राप्त झाले. या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड पोलिस दलाला स्वतंत्र ओळख मिळाली असून, राज्यातील इतर आयुक्तालयांप्रमाणेच आता या आयुक्तालयालाही अधिकृत झेंडा लाभला आहे.











