न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी चार राज्यांत कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि महाराष्ट्र ५००० किलोमीटरचा प्रवास करून सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी दोन ज्येष्ठ नागरिकांची एकूण २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केली होती.
हे आरोपी स्वतःला ब्ल्यू डार्ट कुरिअर अधिकारी, मुंबई पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून सादर करत. त्यांनी व्हॉट्सअॅप कॉल आणि व्हिडिओ कॉलवरून “डिजिटल अरेस्ट” केल्याचे भासवून, भीती दाखवत पैशांची मागणी केली.
एका प्रकरणात पीडितांकडून १ कोटी रुपये आणि दुसऱ्या प्रकरणात १ कोटी ८० लाख रुपये आरोपींनी उकळले. दोन्ही गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल असून, आरोपींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपासानुसार आरोपींच्या बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. प्रमुख आरोपी मोहम्मद आमेर अखील मोहम्मद आरीफ याच्या खात्यावर ७.८६ कोटी रुपयांचे व्यवहार, तर त्याचा ५८ कोटी रुपयांच्या इतर फसवणुकांमध्ये सहभाग असल्याचे आढळले. आणखी एक आरोपी जिगर पटेल याच्या खात्यावर ८.६७ कोटी रुपयांचे व्यवहार आढळले.
ही मोठी कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि त्यांच्या पथकाने केली. पथकाने अत्यंत तांत्रिक तपास करून आरोपींना पकडले.
ही मोहीम सायबर पोलिसांची कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपासाची यशस्वी उदाहरण मानली जात आहे.












