- भाजपविरोधी समीकरणाला वेग?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी संभाव्य एकीची चाहुल देताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांमध्ये समन्वय साधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत असून, शहराध्यक्ष योगेश बहल यांनीही याची पुष्टी दिली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी समिकरण बदलण्याची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार” अशी चर्चा जोर धरत होती. माजी नगरसेवकांचे भाजपकडे झुकणारे पाऊल आणि संघटनातील कमकुवत होत चाललेली पकड पाहता, एकत्र लढणे हा पर्याय दोन्ही बाजूंनी गांभीर्याने विचाराधीन असल्याचे स्थानिक नेत्यांनी सुचवले होते. या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी “अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास हरकत नाही” असे सुस्पष्ट विधान करून वातावरण आणखी तापवले.
याबाबत बोलताना योगेश बहल म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत आमच्याकडून अजित पवारांना प्रस्ताव पोहोचवण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हा संदेश गेला असून त्यावर प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र शरद पवारांसोबतची अंतिम बैठक होणे बाकी असल्याचे अजित पवारांनी सांगितले.”
बहल यांनी पुढे सांगितले की, दोन्ही गट एकत्र येण्यासाठी तयार आहेत आणि आवश्यक असल्यास “दोन पावले मागे जाण्याची” तयारीही दर्शवली आहे. मात्र हे समीकरण केवळ राष्ट्रवादीपुरते मर्यादित राहावे, महायुतीत सामील होण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका दोन्ही बाजूंनी स्पष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील राजकीय वातावरण या चर्चेमुळे चांगलेच रंगले असून, भाजपविरोधात एकत्रित मोर्चा उभा राहू शकतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप दोन्ही गटांकडून अधिकृत घोषणा नसली तरी, दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकीने आगामी निवडणुकीतील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.












