- चौथ्या मुदतवाढीमुळे महापालिकेवर ९ कोटींचा भार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुरू केलेली आंद्रा आणि भामा आसखेड पाणीपुरवठा योजना सातत्याने रखडत असून कामाला लागलेली गती इतक्या वर्षांतही पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचलेली नाही. भामा आसखेड धरणातील १६७ एमएलडी पाणी आणण्यासाठीचे जॅकवेल, पंपिंग स्टेशन आणि १७०० मि.मी. जलवाहिनीचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्याने महापालिकेला पुन्हा एकदा सल्लागार कंपनीला मुदतवाढ द्यावी लागली आहे.
पॅकेज ३ अंतर्गत अशुद्ध जलउपसा केंद्राचे काम ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र केवळ ७५ टक्के कामच झाले आहे. तर नवलाख उंब्रे–देहू मार्गावरील दोन जलवाहिनी प्रकल्प फक्त ५६ टक्क्यांवर पोहोचले आहेत. भूसंपादन, तांत्रिक अडथळे आणि ठेकेदारांचा विलंब ही कारणे पुढे केली जात आहेत.
२०१८ मध्ये नियुक्त डीआरए कन्सल्टंट कंपनीला मूळ ३६ महिन्यांच्या कालावधीनंतर आता चौथी मुदतवाढ देण्यात आली असून खर्च ७.२८ कोटींवरून ९.३१ कोटींवर गेला आहे. प्रकल्पाचे अपूर्ण काम आणि वाढता खर्च यामुळे महापालिकेवर आर्थिक ताण वाढत आहे.












