- हायब्रीड’ युतीचा गुंताही सुटला?..
- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची धूम; पक्षांतर्गत स्पर्धेत तापमानवाढ..
- महायुती–महाआघाडी दोन्हीकडे अनिश्चिततेचे सावट?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२५) :- महापालिका निवडणुकीचा काउंटडाऊन सुरू होताच शहरातील राजकीय समीकरणांचे तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीने सर्व पक्षांच्या आडाख्यांना वेगळे वळण मिळाले असून उमेदवारांबाबतची स्पष्टता अधिकच धूसर झाली आहे. महायुती असो वा महाआघाडी – दोन्ही आघाड्यांत स्वतंत्र हालचाली, अंतर्गत स्पर्धा आणि बैठकींची मालिका यामुळे राजकीय वातावरण चांगलेच चिघळले आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने प्रत्यक्षात एकत्र बसून दिशा ठरवण्याऐवजी स्वतंत्रच मोर्चेबांधणी सुरू ठेवल्याने उमेदवारांना अजूनही वाट पाहावी लागत आहे. काही प्रभागांत संभाव्य उमेदवारांनी पॅनेलची जुळवाजुळव सुरू केली आहे, तर काही ठिकाणी “जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईपर्यंत थांबू” अशी भूमिका घेतली जात आहे. महाआघाडीमध्येही काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांच्या स्वतंत्र हालचालींमुळे जागावाटपासंदर्भात ताणाची शक्यता वाढली आहे.
शिवसेनेचे दोन्ही गट तर काही प्रभागांत समोरासमोर उभे ठाकले असून, सोशल मीडियावर उमेदवारीची दावेदारी ठसविण्यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार मोहीम सुरू आहे. ‘मीच अधिकृत उमेदवार’ ही भावना अनेकांच्या प्रचारातून ठळकपणे दिसत असून त्यामुळे स्थानिक स्पर्धा तीव्र होत आहे.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाबाबत अनिश्चितता कायमच आहे. शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुचवलेला ‘हायब्रीड युती’चा फॉर्म्युला अद्याप ठोस रूप घेताना दिसत नाही. त्यातच भाजपचे शहर निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी पक्ष १२८ जागांवर उमेदवार देण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सहयोगी पक्षांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट यांना किती प्रतिनिधित्व मिळेल, हा प्रश्न आता अधिकच धारदार झाला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीबद्दल शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केलेले विधानही राजकीय चर्चेला नवी दिशा देत आहे.
महाआघाडीतील काँग्रेस मात्र या घडामोडींपासून वेगळी दिशा घेत संघटनात्मक तयारीवरच लक्ष केंद्रित करत आहे. २०१७ मध्ये एकही नगरसेवक निवडून न आणलेल्या काँग्रेसने यंदा नव्या जोमात लढण्याचे संकेत दिले आहेत. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रातील इच्छुकांच्या मुलाखती घेत पक्षाने उमेदवारी प्रक्रियेस गती दिली असून युवा चेहरे आणि माजी पदाधिकाऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
पुढील काही दिवसांत महायुती—महाआघाडीचे तिढे सुटतात की अधिकच गुंतागुंतीचे होतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणूक आता अधिकच रंगतदार होणार, हे मात्र स्पष्ट आहे.












