न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी, पुणे (दि. १७ नोव्हेंबर २०२५) :- कमी किमतीमध्ये दोन किलो सोने देण्याचे आमिष दाखवत दोन अनोळखी इसमांनी भाजी विक्रेता नागरिकाची तब्बल १२ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना प्रकाशात आली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहेत.
दिघी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०५ नोव्हेंबर २०२५ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रघुनंदन चौक, ताजणे मळा, चऱ्होलीु (ता. हवेली) परिसरात ही फसवणूक घडली. भाजी व्यवसाय करणाऱ्या फिर्यादी यांना दोन अनोळखी इसमांनी कमी दरात दोन किलो सोने देण्याची लालच दाखवली.
विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी फिर्यादीला तीन सोन्याचे मणी दिले. हे मणी सोनाराकडे तपासून पाहिले असता ते खरे असल्याचे पुष्टी झाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत फिर्यादीकडून ₹12,95,000 रोख घेतले आणि त्याबदल्यात दोन किलो नकली सोने देऊन फसवणूक केली.
घटनेची माहिती मिळताच फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि कामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











