न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी, पुणे (दि. दि. १७ नोव्हेंबर २०२५) :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात खोट्या प्रवेशपत्रिका तयार करून भाविकांची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात शिवाजी विश्वनाथ पाटील (रा. राधाकृष्ण मंदिर जवळ, केळगाव, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फिर्यादी तुकाराम कृष्णा माने (वय ४६, रा. घुंडरेआळी, आळंदी) यांच्या माहितीनुसार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास मंदिरात कोणताही विशेष कार्यक्रम नव्हता तसेच मंदिर संस्थानाने त्या दिवशी कोणालाही प्रवेशपत्रिका दिलेली नव्हती. मात्र आरोपी पाटील याने मंदिर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त श्री योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ यांच्या सहीचे बनावट छापील प्रवेशपत्र तयार केले.
सदर खोट्या प्रवेशपत्रांवर रामकिसन भगवान केकान, विदया दत्ता केकान, ज्ञानेवश्वर आत्माराम चाटे, नाकदेव सोपान केकाण अशी नावे देत या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला. खोट्या पत्रिकांचा उपयोग करून भाविकांना ते वैध असल्याचे भासवण्यात आरोपी यशस्वी झाला.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर माने यांनी त्वरित तक्रार दिली. आळंदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनि खडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











