- निवडणूक विभागाच्या पारदर्शक कारभाराच नागरिकांना आश्चर्य?…
- प्रभाग १९ आणि ३० मधील दोन-दोन जागांची फेरबदल…
- या निर्णयाने अनेक इच्छुकांची समीकरणे बदलली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरक्षणात राज्य निवडणूक आयोगाने सोमवार (दि. १७) बदल केले आहेत. पिंपरी कॅम्प, भाटनगर प्रभाग क्रमांक १९ आणि दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभाग क्रमांक ३० मधील प्रत्येकी दोन जागांत बदल झाले आहेत. जागेतील बदलामुळे काही इच्छुकांनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
जागेतील बदलामुळे सर्वसाधारण खुल्या (ओपन) गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) माजी नगरसेविका स्वाती काटे, ओबीसी गटातील भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे या अडचणीत आल्या असून, माजी नगरसेवक रोहित काटे, राजेंद्र काटे, संजय काटे तसेच, भाजपाच्या माजी नगरसेविका कोमल मेवानी, आशा शेंडगे यांना संधी निर्माण झाल्या आहेत.
पालिकेने मंगळवार (दि.११) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जाहीरपणे आरक्षण सोडत काढली. एकूण १२८ पैकी ९२ जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी प्रभाग क्रमांक १९ व ३० मधील प्रत्येकी दोन जागांमध्ये सोमवारी (दि.१७) राज्य निवडणूक आयोगाकडून बदल करण्यात आला आहे. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभाग क्रमांक ३० मधील ओबीसीची जागा महिला राखीव करण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी आलेल्या माजी नगरसेविका आशा शेंडगे तसेच, राष्ट्रवादीच्या प्रतिमा जोशी, संध्या गायकवाड, शुभांगी गायकवाड आदी इच्छुकांना संधी निर्माण झाली आहे. मात्र, ओबीसी गटातून तयारी करणाऱ्या इच्छुकांची गोची झाली आहे.
काही इच्छुकांनी आपल्या सौभाग्यवतीस निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. ओबीसी जागेत बदल झाल्याने सर्वसाधारण खुला महिला ही जागा सर्वसाधारण खुला झाला आहे. त्यामुळे त्या जागेवरील माजी नगरसेविका स्वाती काटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्या जागेवर त्यांचा मुलगा शेखर काटे इच्छुक आहे. तसेच, माजी नगरसेवक रोहित काटे, राजेंद्र काटे, संजय काटे तसेच, अमोल मोटे या इच्छुकांना संधी निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक १९ ब मध्ये ओबीसी महिला जागा ओबीसी झाली आहे. त्यामुळे भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमीम पठाण, शिल्पा बनसोडे, इरफाना शेख या इच्छुक महिला अडचणीत सापडल्या आहेत. तर, दोन खुल्या जागांपैकी एक जागा महिला राखीव झाल्याने फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे स्थिती त्या दोन जागेवर निर्माण झाली आहे. खुल्या महिला जागेत भाजपाच्या माजी नगरसेविका कोमल मेवानी तसेच, विजया भोईर, विद्या गोलांडे, लक्ष्मी देवकर, अश्विनी बांगर या इच्छुकांना संधी निर्माण झाली आहे.











