- डंपरच्या धडकेत अवघ्या विशीतच गमावला जीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १८ नोव्हेंबर २०२५) :- हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी (दि. १७) दुपारी अवजड डंपरच्या धडकेत २० वर्षीय तन्वी सिद्धेश्वर साखरे हिचा जागीच मृत्यू झाला. मुक्तानंद हाइट्स, गावठाण रस्ता, हिंजवडी येथे राहणारी ही तरुणी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना हा भीषण अपघात घडला. डंपर चालक अजय अंकुश ढाकणे (वय २०, रा. जांबे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तन्वी आणि तिचे वडील एमएच-१४ केव्ही-३८८३ या दुचाकीवरून जांबे येथील आर-१६, कोलते पाटील, न्यू सर्कल परिसरातून मारुंजीकडे जात होते. पाठीमागून येणाऱ्या डंपरने (एमएच-१४ एचयू-९८५५) जोरदार धडक दिल्याने तन्वी चाकाखाली सापडली आणि जागीच मृत्यू झाला. अपघातात तिचे वडील जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती. तिला एक धाकटी बहीण असून वडील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. अपघाताची माहिती मिळताच परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.
अवजड वाहनांचा त्रास…
हिंजवडी आयटी परिसरात दगड, खडी, माती, डबर तसेच सिमेंट रेडीमिक्स वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अवाजवी वेग, बेफिकीर वाहन चालवणे आणि खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी अनेकदा आंदोलन, मोर्चे आणि निषेध करून आवाज उठवला असला तरी परिस्थिती जसंच्या तशीच आहे.
खराब रस्त्यांमुळे अपघात वाढले
अवजड वाहनांतून रस्त्यावर पडणारी खडी, डबर, वाळूमुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय अनेक प्रमुख रस्त्यांची दुरवस्था भयावह झाल्याने त्यावरून जाणे धोकादायक ठरले आहे.
अपघाताची बातमी समजताच गावठाण रस्ता परिसरात मोठी गर्दी झाली. स्मशानभूमीत तन्वीच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या आई-वडिलांचा आणि बहिणीचा हंबरडा फोडला. त्या आक्रोशाने उपस्थित ग्रामस्थही हळहळून रडू लागले होते.











