न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ नोव्हेंबर २०२५) :- सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा वरिष्ठ नागरिकांना लक्ष्य करत धक्कादायक प्रकार केला आहे. निगडी प्राधिकरण येथील ७० वर्षीय पवनकुमार कामरा यांची तब्बल २,१४,७०,३५८ रुपये रक्कम ऑनलाईन फसवून आरोपींनी लांबवली. या गुन्ह्याची नोंद सायबर पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आली आहे.
घटना २९ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान घडली. फिर्यादींच्या घरी ऑनलाईन संपर्क साधून स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून सादर करणाऱ्या आरोपींनी फिर्यादींच्या पत्नीच्या नावाने सिमकार्ड घेतल्याचे खोटे सांगितले. त्यावर २० तक्रारी असल्याचे सांगत त्यांनी फिर्यादी दाम्पत्यास मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.
यानंतर आरोपींनी बँकेतील पत्नीच्या खात्यात पीएफआय संघटनेचे पैसे आल्याचा खोटा दावा केला. अटकेची भीती दाखवून घाबरवले आणि आपली ओळख वरिष्ठ अधिकाऱ्यांची असल्याचे दाखवण्यासाठी बनावट पीडीएफही पाठवली.
विश्वास बसल्यावर आरोपींनी ‘पडताळणी’च्या नावाखाली फिर्यादींकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसा ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यामुळे एकूण २.१४ कोटींची आर्थिक फसवणूक झाली.
या प्रकरणी सायबर पोलीसांनी मोबाईल क्रमांक वापरणारे आरोपी संदिप रॉय, प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोनि नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून कोणताही सरकारी अधिकारी फोनवर खाते तपशील, पैसे किंवा धमकी देत नसल्याचे स्पष्ट केले आहे.











