- वाढीव खर्च, उशीर आणि पाणीटंचाईबाबत महापालिका धारेवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ नोव्हेंबर २०२५) :- आंद्रा–भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेतील दिरंगाईमुळे शहरात वाढत जाणाऱ्या पाणीटंचाईवर आम आदमी पार्टीने आज मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यासाठी आपने मनपा आयुक्तांना निवेदन दिले.
आपच्या मते, वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही ही योजना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच अर्धवट काम असूनही प्रकल्प सल्लागार संस्थेला सलग चौथी मुदतवाढ देऊन ₹९ कोटी ३१ लाख वाढीव खर्च मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
योजनेतील विलंब आणि वाढीव खर्च हा नागरिकांच्या कराच्या पैशांचा अपव्यय असल्याचे आपने सांगितले.
आपने प्रशासनाकडे उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, वाढीव खर्चाची तपासणी करावी, योजना पूर्ण करण्याची अंतिम मुदत जाहीर करावी, दिरंगाईस जबाबदारांवर कारवाई करावी, अशा मागण्या केल्या आहेत.
आपचे शहराध्यक्ष रविराज काळे म्हणाले की, मनपाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तत्काळ कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.










