न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १८ नोव्हेंबर २०२५) :- मोशी परिसरात झालेल्या भीषण अपघातात वेस्पा दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. संत कृपा ट्रान्सपोर्टजवळ घडलेल्या या अपघातानंतर आयशर वाहनाचा चालक पळून गेल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी भोसरी MIDC पोलिसांत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीत प्रल्हाद काळजे (वय ४८) हे आपल्या घरातून मोशी येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला खरेदीसाठी वेस्पा दुचाकी घेऊन निघाले होते.
ते संत कृपा ट्रान्सपोर्टजवळ आले असता आयशर गाडीच्या चालकाने निष्काळजीपणे पुढे निघण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते खाली कोसळले आणि आयशरच्या मागील चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आयशरचा चालक गाडी रस्त्याच्या कडेला सोडून पसार झाला.
मृत व्यक्तीचे भाऊ अतुल अरुण काळजे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











