- महापालिका म्हणतेय तर, नवीन पाइपलाइन टाकण्याची कार्यवाही तातडीने करू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरीतील संत तुकारामनगर अग्निशामक दलाच्या शेजारच्या संत तुकारामनगर रहिवासी सोसायटीतील नळांतून गेल्या दोन दिवसांपासून अळ्यायुक्त दूषित पाणी येत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्यात येणाऱ्या पाण्यात जिवंत अळ्या दिसू लागल्याने आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सोमवार (दि. १७ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास रहिवासी अनिल निरगुडकर यांनी पाणी भरताना नळाच्या पाण्यात जिवंत अळ्या पाहिल्या. त्यांनी तत्काळ ते पाणी फेकून दिले. मंगळवारी (दि. १८ नोव्हेंबर) सकाळी पावणेसात वाजता पाणी घेताना पुन्हा अळ्या दिसल्याने त्यांनी पाणी वापरण्यास नकार दिला. सोसायटीतील इतर रहिवाशांनाही अशीच समस्या भेडसावत असल्याचे समोर आले आहे.
या सोसायटीत एकूण ८ इमारतींमध्ये सुमारे ९६ रहिवासी वास्तव्याला असून, पाणीपुरवठ्याची नळजोडणी जमिनीखालच्या मुख्य टाकीतून होते. काही दिवसांपूर्वी ही टाकी स्वच्छ करण्यात आली होती; मात्र अळ्यायुक्त पाणी येण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या तक्रारीची दखल घेत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता साकेत पावरा यांनी सांगितले की, “संत तुकारामनगर रहिवासी सोसायटी परिसराची तातडीने पाहणी करून या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्याची कार्यवाही त्वरित करण्यात येईल.”
दूषित पाणीपुरवठा थांबवण्यासाठी रहिवाशांनी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली असून महापालिकेकडून तातडीची कारवाई होण्याची अपेक्षा आहे.











