- महापालिका भवनावर मोर्चा, निवडणूक विभागात गोंधळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण सोडतीत राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या फेरबदलामुळे प्रभाग क्रमांक ३० मध्ये नाराजीचा उद्रेक झाला आहे. बदलांच्या निषेधार्थ या प्रभागातील इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी (दि. १८) महापालिका भवनावर मोर्चा काढत निवडणूक विभागात गोंधळ घालत संताप व्यक्त केला.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दोन प्रभागांत बदल…
११ नोव्हेंबर रोजी ३२ प्रभागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाने दोन प्रभागांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. प्रभाग ३० मध्ये ओबीसी महिला ‘थेट’ आरक्षण लागू करणे आवश्यक होते; परंतु महापालिकेने निवडणूक सोडतीद्वारे ते ठरवले. त्यामुळे ही सोडत रद्द करत दोन प्रभागांमध्ये बदल करण्यात आले. याचा चार जागांवर परिणाम झाला असून त्यामुळेच प्रभागातील इच्छुक उमेदवार आक्रमक झाले.
गोंधळ, रोष आणि आक्रमक भूमिका…
मोर्चाच्या वेळी आंदोलकांनी निवडणूक विभागात घोषणाबाजी करत आरक्षण बदलाचा निषेध केला. “११ नोव्हेंबरचे आरक्षण कायम ठेवा, अन्यथा आम्हाला आणखी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल”, असा इशारा आंदोलकांनी दिला. उपायुक्त सचिन पवार यांनी संबंधितांना कागदपत्रे दाखवत स्पष्टीकरण दिले.
निवडणूक विभागाचे स्पष्टीकरण…
उपायुक्त पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाने हरकती आणि सूचना देण्यासाठी संधी दिली आहे. नागरिक हवे असल्यास हरकती दाखल करू शकतात. केलेले सर्व बदल राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच झाले असून त्यांचे आदेश सर्वांसाठी उपलब्ध आहेत.”
प्रभाग ३० मधील आरक्षण बदलामुळे राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











