- पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, दिघी भागांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी–निगडी मार्गावरील जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून या कामात येणाऱ्या एमआयडीसीच्या (MIDC) मुख्य जलवाहिनीचे स्थलांतर करण्यात येत आहे. यासाठी गुरुवार (दि. २७) सकाळी ८ वाजेपासून ते शुक्रवार (दि. २८) सकाळपर्यंत तब्बल २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली.
पाणीपुरवठा बंदच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक परिसरात पाण्याची तीव्र गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक साठा करून ठेवण्याचे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, जलवाहिनी स्थलांतराच्या या कामाचा परिणाम पुढील तीन दिवस (शुक्रवार, शनिवार, रविवार) पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. या काळात पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होऊ शकतो, अशी माहिती देत प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले.
या कामाबाबत महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनने एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, आर अॅण्ड डी दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि ओएफडीआर या भागांमध्ये कमी दाबाचा पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.












