न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२५) :- निवडणुकीचे वातावरण तापत असताना जिल्हा प्रशासनाने आगामी नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांसाठी विविध शासकीय विभागांकडून मनुष्यबळ मागविले होते. मात्र, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) त्यांच्या सुरू असलेल्या प्रकल्पांना अडथळा नको, म्हणून निवडणूक कामकाजासाठी मनुष्यबळ देणे शक्य नसल्याचे जिल्हा प्रशासनास पत्राद्वारे कळवले आहे.
पीएमआरडीए अंतर्गत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर तब्बल १०१ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांवर प्राधिकरणातील महत्त्वाच्या विकासकामांची जबाबदारी आहे. निवडणुकांसाठी हे अधिकारी दिल्यास पीएमआरडीएच्या प्रकल्पांवर प्रतिकूल परिणाम होऊन कामे खोळंबण्याची शक्यता असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
सध्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू असून त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांचेही वेळापत्रक जाहीर होणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. त्या अनुषंगाने महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही निवडणुकीची पत्रे पाठवली गेली असून, दोन अधिकाऱ्यांना निरीक्षक पदाची वेगळी जबाबदारीही देण्यात आली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन यांच्यात मनुष्यबळाबाबत पत्रव्यवहार सुरू आहे. प्रकल्पांचे कामकाज सुरळीत ठेवताना निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्याचे मोठे आव्हान दोन्ही प्रशासनांसमोर उभे राहिले आहे.












