- शहरातील तीन ठिकाणी पोलिसांची धडक छापेमारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील अनैतिक व्यापार रोखण्यासाठी सलग तीन स्वतंत्र कारवाया करत बावधन, बालेवाडी आणि काळेवाडी परिसरात वेश्याव्यवसायासाठी नागरिकांना आमिष दाखवणाऱ्या सहा महिलांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.
तिन्ही ठिकाणी महिलांनी सार्वजनिक रस्त्यांवर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना लैंगिक हावभाव करून अडथळा निर्माण केल्याचे तसेच शिष्टाचाराचा भंग केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पहिला गुन्हा बावधन येथे एका हॉटेलच्या दक्षिणेस असलेल्या सर्व्हिस रोडवर २४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. याच रात्री बालेवाडी स्टेडियम सिमाभिंतलगतच्या सर्व्हिस रोडवर दुसरी कारवाई करण्यात आली. दोन्ही ठिकाणी बावधन पोलीस स्टेशनच्या पथकांनी दोन-दोन महिलांना सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढल्याने गुन्हे दाखल केले आहेत.
तर तिसरी कारवाई २५ नोव्हेंबर रोजी काळेवाडीतील जगताप डेअरी दरम्यानच्या फुटपाथवर करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकास दोन महिला अशाच प्रकारे वावरताना आढळून आल्याने त्यांनी गुन्हा नोंदवला आहे.
सर्व प्रकरणांत अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ नुसार गुन्हे नोंदवले असून आरोपी महिलांना अद्याप अटक झालेली नाही. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी करीत आहेत.












