- प्रभाग ३० वर सर्वाधिक आक्षेप; अंतिम निर्णय आयुक्तांचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण १२८ जागांचे दुरुस्तीसह आरक्षण सोडत सोमवारी (दि. १७) जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर मुदतीत एकूण ७२ हरकती महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. आता या सर्व हरकतींवर आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर निर्णय घेणार असून, त्यानुसार तयार होणारा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे.
महापालिकेने ११ नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सर्वांसमोर आरक्षण सोडत काढली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या दुरुस्त्यांनुसार सुधारित यादी १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली. या सुधारित यादीत श्रीधरनगर, भाटनगर, पिंपरी भाजी मंडई (प्रभाग १९) आणि दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी (प्रभाग ३०) मधील प्रत्येकी दोन जागांच्या आरक्षणात फेरबदल करण्यात आले. परिणामी, यातील प्रभाग क्रमांक ३० संदर्भातील सर्वाधिक हरकती दाखल झाल्या आहेत.
निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाखल झालेल्या सर्व हरकती व सूचनांची छाननी करून आयुक्त हर्डीकर आपला निर्णय नोंदवणार आहेत. त्यावर आधारित अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविला जाईल. त्यानंतर महापालिकेकडून आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आरक्षणातील बदलांमुळे काही प्रभागांचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता असल्याने इच्छुक, पदाधिकारी आणि नागरिक याकडे उत्सुकतेने पाहत आहेत.












