न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि २८ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्गाच्या आराखड्यात मोठे बदल करण्याचा निर्णय पुणे महामेट्रोने घेतला आहे. वाढती लोकसंख्या, प्रवासीभार आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून नवीन सुधारित आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून पुढील एका महिन्यात हा प्रस्ताव अंतिम होणार आहे.
सध्याचा दापोडी–पिंपरी मार्ग विस्तारित करत मेट्रोचे जाळे निगडीपर्यंत पोहोचले आहे. येथून चाकणपर्यंतचा दुसरा टप्पा उन्नत मार्गिका आणि ३१ स्थानकांसह आखला होता. या पूर्वीच्या आराखड्यात पिंपरी-चिंचवडमध्ये २५ तर चाकण नगरपरिषद हद्दीत ६ स्थानके प्रस्तावित होती. या प्रकल्पाचा खर्च तब्बल १०,३८३ कोटी रुपये होणार होता.
सप्टेंबरमध्ये पालकमंत्री अजित पवार आणि लोकप्रतिनिधींनी जुन्या आराखड्यावर अनेक सूचना केल्या. विशेषत: तीनऐवजी सहा डब्यांच्या गाड्या, भोसरीचा समावेश, नाशिकफाटा–भोसरी–तळवडे मार्गाचे पर्यायी संरेखन, उड्डाणपुलातील अडथळे दूर करणे आणि सर्व स्थानकांजवळ पर्याप्त वाहनतळाची व्यवस्था अशा सुधारणांची मागणी झाली.
या सर्व मुद्द्यांचा विचार करून सुधारित आराखड्याची तयारी सुरू आहे. मार्गिका वाढल्यास खर्चात वाढ होऊ शकते, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. सुधारित आराखडा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे सादर झाल्यानंतर राज्य व केंद्र शासनाची मान्यता प्रक्रिया पुढे जाईल.












