- मतदार यादीतील धक्कादायक घोळ..
- महापालिका निवडणूक लढविण्याचा मार्गच बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांतील गोंधळाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोसरी मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान केलेले असताना, एका इच्छुक दाम्पत्याची नावे अचानक बारामती आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये हलवण्यात आली आहेत. या घटनेमुळे महापालिका निवडणुकीसाठी ते पूर्णपणे अपात्र ठरले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या आई-वडिलांच्या नावांबाबत घडला आहे. इम्रान शेख यांनी निवडणूक विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.
इम्रान शेख यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांचा युनूस शेख यांचे नाव थेट इंदापूर विधानसभेत, तर आई राबिया शेख यांचे नाव बारामतीच्या शिरसुफळ भागात टाकले गेले आहे. मागील ३५ वर्षांपासून आमचे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्येच आहे. आम्ही कधीही पत्ता बदलाचा अर्ज केला नाही. तरीही आमची नावे बाहेरच्या मतदारसंघात हलवली गेली. यामुळे आमच्या आई-वडिलांची महापालिका निवडणूक लढविण्याची संधी हिरावली गेली. ते पुढे म्हणाले की, प्रभाग ८ आणि प्रभाग ९ मधून दोघेही इच्छुक होते आणि पक्षाकडून एका व्यक्तीस उमेदवारी देण्याची तयारी सुरू होती. शेख यांनी हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा आरोप केला असून या चुकांनी निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे सांगितले. राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या वरिष्ठ नेत्यांनीही हा मुद्दा उचलून राज्य निवडणूक आयोग आणि सरकारवर तीव्र टीका केली आहे. “मतदार यादीतील या घोळामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा निर्माण झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी,” अशी मागणी इम्रान शेख यांनी केली.
दरम्यान, मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील त्रुटींमुळे प्रशासन आणि निवडणूक आयोगावर दबाव वाढत असून, आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी हा गंभीर मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे.












