- ग्राहक त्रस्त; विलंब, अनावश्यक आक्षेप आणि अधिकाऱ्यांची मनमानी बंद करा..
- शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांचे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२५) :- महावितरणच्या भार मंजुरी (लोड संक्शन) प्रक्रियेतून ग्राहकांना होणारा सातत्यपूर्ण त्रास, विलंब आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक तथा पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष रमाकांत सौंदणकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता, पुणे परिमंडळ यांना निवेदन सादर करून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
सौंदणकर यांनी मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांना त्रासदायक ठरत असलेल्या महावितरणच्या भार मंजुरी (लोड संक्शन) प्रक्रियेत तातडीने सुधारणा करण्यात यावी. एकीकडे महावितरणची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असताना ग्राहकांना अडचणी, विलंब आणि अधिकाऱ्यांचे मुजोर वर्तन यामुळे लालफितीच्या कारभाराचा सामना करावा लागत आहे. अधिकाऱ्यांसह कर्मचारी हा टेंभा मिरविण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे महावितरणने तत्काळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून कार्यालयीन कामकाजाची पद्धत निश्चित करावी.
महावितरणच्या शाखा आणि सर्कल कार्यालयांमध्ये भार मंजुरी प्रक्रियेसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) अस्तित्वात असली तरी प्रत्यक्षात तिचे पालन होत नाही. विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव, अनावश्यक तांत्रिक आक्षेप, वेगवेगळ्या अंदाजपत्रकांचे दर, तसेच मंजुरीसाठी फाइल्सची लांबणीवर टाकली जाणारी प्रक्रिया या सर्व गोष्टींमुळे नागरिकांचा आणि व्यावसायिकांचा संयम संपत चालला आहे.
अनेक ग्राहक लघु-उच्चदाब कनेक्शनकरिता विभागाकडे अर्ज करीत असतात. परंतु काही वेळा सिस्टीममधील तांत्रिक कारणे दाखवत त्यांची अडवणुक होते. अर्ज परीपूर्ण असतानाही ग्राहकांना नव्याने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले जातात. तर,
काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून महिनोंमहिने जाणूनबुजून विलंब लावून नागरिकांना त्रास दिला जातो. ग्राहक हा महावितरणचा केंद्रबिंदू आहे; त्याच्याशी अन्याय होणार नाही, याची जबाबदारी महावितरणवर आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता, महावितरण ग्राहकांचा मित्र न राहता त्रासदायक यंत्रणा बनला आहे.
दरम्यान महावितरणने भार मंजुरी प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि ग्राहकाभिमुख दृष्टीकोन आणण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा आयोजित केली जावी. जेणेकरून नियमांची सुस्पष्ट व्याख्या, एकसंध अंदाजपत्रक प्रणाली आणि ग्राहक संवाद सुधारण्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण, अधिकाऱ्यांच्या उत्तरदायित्वात वाढ आणि महावितरणच्या कार्यसंस्कृतीत सुधारणा या त्रिसूत्री उद्दिष्टांसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.
या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, जेणेकरून ग्राहकांना सुलभ आणि पारदर्शक सेवा मिळू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
“ग्राहक हा महावितरणचा केंद्रबिंदू आहे; पण सध्या महावितरण ग्राहकांसाठी त्रासदायक यंत्रणा बनली आहे. भार मंजुरी प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणणे अत्यावश्यक आहे.”
-संतोष सौंदणकर, चिंचवड विधानसभा – शहर संघटक तथा पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य…












