- ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचा पुढाकार..
- रविवारी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे शहरात..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२५) :- राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले असून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारीला वेग दिला आहे. काही दिवसांपूर्वी घोषित केलेल्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
बैठकीत निवडणूक नियोजनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. “कोअर कमिटीच्या माध्यमातून आम्ही इच्छुक पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू करीत आहोत. तसेच पक्षाबाहेरील इच्छुक उमेदवारांचेही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विधानसभानिहाय तसेच शहर पातळीवरील प्रतिनिधींची निवड करून अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू केली आहे,” अशी माहिती आझमभाई पानसरे यांनी दिली.
गेल्या पाच-सात वर्षांत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभार भोंगळ पद्धतीने झाल्याचा आरोप करत “पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शहरासाठी पुन्हा नव्याने जोमाने कामाला प्रारंभ करणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी सांगितले की, प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे, रोहित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता व इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याचबरोबर महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे उद्या चिंचवड येथील विरंगुळा केंद्रात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
विधानसभा निहाय अर्ज स्वीकृती प्रतिनिधी:
शहर: तुषार कामठे, देवेंद्र तायडे
भोसरी विधानसभा: काशिनाथ जगताप, इम्रान शेख
पिंपरी विधानसभा: सुलक्षणा शिलवंत, संदीप चव्हाण
चिंचवड विधानसभा: सुनिल गव्हाणे, तुषार कामठे
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वरील पदाधिकाऱ्यांकडे दाखल करावेत, असे आवाहन शहर सरचिटणीस जयंत शिंदे यांनी केले.


















