- अभ्यासू, संयमी आणि तरुण नेतृत्वाला सभागृहाची पुन्हा एकमुखाने मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०८ डिसेंबर २०२५) :- हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत, भाजपचे तरुण, अभ्यासू आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी सभागृहात केली.
पुणे जिल्ह्यातील दिग्गज नेतृत्वाच्या परंपरेत नवा अध्याय जोडत गोरखे यांना पुन्हा एकदा सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमुखी समर्थन दिले. संतुलित, शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जाणारे गोरखे यांची पुनर्नियुक्ती ही जिल्ह्याच्या विधायक नेतृत्वाची मोठी अभिमानाची बाब ठरली आहे.
पुनर्नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले,
“तालिका सभापतीपद ही केवळ भूमिका नसून विधानपरिषदेच्या कार्यवाहीतील शिस्त आणि प्रक्रियात्मक पारदर्शकतेचे प्रतीक आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास अत्यंत सन्मानाची बाब असून मी पूर्ण प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडेन.”
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मार्गदर्शनाबद्दल मन:पूर्वक आभार मानले.
वक्तृत्वशैली, मुद्देसूद अभ्यास आणि जनसंपर्कासाठी ओळखले जाणारे गोरखे हे सध्या राज्य युवा धोरण समितीचे निमंत्रित सदस्य आहेत. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे विधानपरिषदेत भाजपच्या युवा, शिक्षित नेतृत्वाला बळ मिळेल आणि सभागृहातील कामकाजात नवा ऊर्जा प्रवाह निर्माण होईल, असा विश्वास सभागृहाने व्यक्त केला आहे.













